You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'27 गुंठ्यातील 7 गुंठे जमीन वाहून गेली, आम्ही करायचं काय?'; सिंधुदुर्गातील 'हे' गाव धोक्यात का आलं?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"उद्या गाव वाचलं नाही, तर आम्ही जाणार कुठे, खाणार काय, करणार काय काहीच नाही."
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तोंडवली-तळाशील गावातील समिता केळुसकर यांचा हा प्रश्न आज संपूर्ण गावाची व्यथा मांडतो.
एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधोमध वसलेलं तोंडवली - तळाशील गाव सध्या अस्तित्वासाठी झगडतंय.
समुद्रातील यांत्रिक मासेमारी, खाडीतील वाळू उत्खनन, किनारपट्टीची धूप आणि बदलतं पर्यावरण यामुळे गावकऱ्यांच्या उपजीविकेवर आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.
मात्र प्रशासन गाव आणि समुद्रकिनारा सुरक्षिततेसाठी बंधारा आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं सांगत आहे.
निसर्ग संपन्न तोंडवली - तळाशील
निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील हे एक गाव.
या गावाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता पुर्वेला गड, नदी, खाडी पात्र, पश्चिमेला अथांग विस्तारलेला अरबी समुद्र आणि दक्षिणेस नदी आणि समुद्राचा मनमोहक असा संगम आहे.
तीन बाजूंनी पाणी असलेले आणि वाळूवर वसलेलं हे तोंडवळी तळाशील गांव आणि बीच परिसर.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला अन् हे गाव नावारूपास आले. आज देश विदेशातील लाखो पर्यटक दरवर्षी या गावात येतात. येथील समुद्र किनाऱ्याचा, इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. याच तळाशील गावाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम गावात पोहचली. तर गावात सर्वत्र गावकरी गाव नकाशावरून नष्ट होण्याची चिंता व्यक्त करताना दिसले.
पाणी आणि जमिनीचा प्रश्न गंभीर
तळाशील गाव वाळूच्या संचयावर वसलेलं आहे. ग्रामस्थांच्या मते, गेल्या काही दशकांत वाढत्या धुपीमुळे आणि खाऱ्या पाण्याच्या अतिक्रमणामुळे अनेकांची जमीन वाहून गेली आहे.
समुद्र आणि खाडीचे क्षारयुक्त पाणी जाऊन विहिरीतील पाणी क्षारयुक्त झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
सद्यस्थिती पाहण्यासाठी बीबीसी मराठीची टीम तळाशील गावात पोहोचली. दरम्यान गावात कोणालाही विचारलं तरी गावातील समस्या आणि भविष्यातील भीतीदायक परिस्थिती सर्वांकडून ऐकायला मिळत होती.
त्यात 56 वर्षांच्या समिता केळुसकर आम्हाला तिथे भेटल्या. समिता केळुसकर सांगत होत्या, "आजूबाजूला रेतीवाल्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 1.5 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं. आमच्या 27 गुंठे जमिनीतले 20 गुंठे जमीन राहिली, 7 गुंठे जमीन वाहून गेली. मग आम्ही करायचं काय? वारंवार प्रशासनाकडे आम्ही मागणी करूनही लक्ष दिले जात नाही.
गाव वाचवण्यासाठी 3 महिन्यांपूर्वी महिलांनी पाण्यात उतरून आंदोलनही केलं होतं. मात्र ग्रामस्थांच्या मते हा संघर्ष नवीन नसून अनेक दशकांपासून सुरू आहे.
पारंपारिक मासेमारीवर परिणाम
तळाशीलमधील संकट केवळ जमिनीपुरतं मर्यादित नाही.
तर या गावातील पारंपारिक सर्वांचा उदरनिर्वाह असलेल्या मासेमारीवर देखील याचा परिणाम झाला आहे.
गावातील पारंपारिक मच्छिमारांचं म्हणणं आहे की, खाडीतील वाळू उपसा आणि समुद्रातील एलईडी पर्स सीनसारख्या यांत्रिक मासेमारीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
तळाशीलमधील संकट केवळ जमिनीपुरतं मर्यादित नाही.
तर या गावातील पारंपारिक सर्वांचा उदरनिर्वाह असलेल्या मासेमारीवर देखील याचा परिणाम झाला आहे.
गावातील पारंपारिक मच्छिमारांचं म्हणणं आहे की, खाडीतील वाळू उपसा आणि समुद्रातील एलईडी पर्स सीनसारख्या यांत्रिक मासेमारीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
68 वर्षीय मच्छिमार नागेश कोचरेकर सांगतात, "3 पिढ्यांपासून आम्ही मासेमारी करतोय. एका बाजूला समुद्रातील एलईडी पर्स सीन मासेमारी आणि दुसऱ्या बाजूला वाळू उत्खनन यामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. विकायचं सोडा, आता खायलाही मासे मिळत नाहीत."
धुपीमुळे वाढली अस्तित्वाची भीती?
सुमारे 140 घरं आणि 550 लोकसंख्या असलेल्या तळाशीलमध्ये मासेमारी, फळबागा, पर्यटन आणि होमस्टे हे प्रमुख उदरनिर्वाहाचे स्रोत आहेत.
मात्र ग्रामस्थांच्या मते, गेल्या काही वर्षांत खाडी आणि समुद्राचं खारं पाणी गावात शिरू लागलं आहे. त्यामुळे जमीन खचण्याचं प्रमाण वाढलं असून काही भागात नदीने अनेक मीटरपर्यंत जमीन गिळंकृत केल्याचा दावा स्थानिक करतात. तशी परिस्थिती गावात पाहायला देखील मिळते.
ताता टीकम म्हणतात, "येणाऱ्या पावसात समुद्राची एक मोठी लाट नदीत आली, तर गावाचे 2 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही सातत्याने गेल्या काही वर्षापासून आंदोलन आणि सरकार दरबारी निवेदन देऊन आमच्या मागण्या मांडत आहोत. पण अजूनही मागण्या पूर्णपणे मान्य झालेल्या नाहीत. बंधाऱ्याचे काम अनेक वर्ष रखडलेला आहे."
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या काय?
ग्रामस्थांची मागणी आहे की,
- खाडीतील वाळू उत्खनन कायमस्वरूपी बंद करावं
- खाडीकिनारी रस्ता-कम-बंधारा उभारावा
- पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावं
- वाहून गेलेल्या जमिनींचा प्रश्न सोडवावा
- प्रवासासाठी पूल आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर सांगतात, "गेली 40 वर्षे गावकरी या प्रश्नांसाठी लढत आहेत. लवकरात लवकर पक्का बंधारा आणि आवश्यक विकासकामं व्हावीत, ही आमची मागणी आहे. पुढे देखील आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारू."
'गावाच्या अस्तित्वावर आलेले गंभीर संकट'
पर्यावरण अभ्यासक आणि वनशक्तीचे संचालक दयानंद स्टॅलिन म्हणाले, "आमच्या पाहणी अहवालानुसार, तोंडवली-तळाशील हे गाव अत्यंत नाजूक किनारी परिसंस्थेमध्ये वसलेले आहे. गेल्या काही वर्षांत खाडीतील मोठ्या प्रमाणावरील वाळू उत्खननामुळे खाडीचा नैसर्गिक समतोल बिघडला असून किनाऱ्याची धूप वेगाने वाढली आहे."
"त्यामुळे झाडांची मुळे उघडी पडली आहेत, किनारा खचत आहे आणि समुद्राच्या खाडीचे पाणी गावाच्या भूभागात आतपर्यंत शिरत आहे. त्याचा परिणाम म्हणून विहिरींचे पाणी खारट झाले असून गावाची जमीनही आतून पोकळ होत चालल्याची चिन्हे आहेत. ही केवळ पर्यावरणीय हानी नसून गावाच्या अस्तित्वावर आलेले गंभीर संकट आहे," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, "या परिस्थितीत अवैध वाळू उत्खननावर कायमस्वरूपी आणि प्रभावी बंदी, वैज्ञानिक पद्धतीने किनारपट्टीचे संरक्षण, खाडीचे पुनर्भरण, तसेच समुद्री प्रवाहाचा अभ्यास करून ब्रेकवॉटर उभारणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे."
"योग्य वेळी शास्त्रीय उपाययोजना केल्या नाहीत, तर तळाशीलसारखे ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव भविष्यात नकाशावरून नाहीसे होण्याची भीती आहे. यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी आणि संबंधित शासकीय प्राधिकरणांना पत्र देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे पर्यावरणीय आणि मानवी संकट म्हणून पाहून त्वरित कृती करणे आवश्यक आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
प्रशासन काय म्हणतं?
मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बेकायदेशीर वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. कायदेशीर वाळू उपशासंदर्भात न्यायालयीन स्थगिती आहे. पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामपंचायतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक नियोजन केलं जाईल. तसेच जमिनीच्या मोजणीसाठी आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी मदत केली जाईल."
दरम्यान, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधिकारी समाधान जाधव यांनी सांगितलं की, या परिसरातील किनारपट्टी संरक्षणासाठी टप्प्याटप्प्याने बंधारे उभारले जात आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत सुमारे 1 किलोमीटर लांबीच्या बंधाऱ्याचं काम सुरू असून ते मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
"उद्या आम्ही जाणार कुठे?"
तळाशीलमधील लोक आज आपलं गाव, जमीन आणि उदरनिर्वाह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र वेळेत उपाययोजना झाल्या नाहीत, तर हे संकट आणखी गंभीर होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.
स्वप्नाली तारे यांचा संतापही त्यातूनच व्यक्त होतो. त्या म्हणतात, "जर शासनाला महसूलच हवा असेल, तर आम्हाला मारून टाका आणि गाव दत्त घ्या."
समुद्राची प्रत्येक लाट तळाशीलच्या किनाऱ्यावर आदळते, तसं ग्रामस्थांच्या मनातील एकच प्रश्न अधिक तीव्र होत जातो. उद्या हे गाव आणि ही जमीनच उरली नाही, तर आम्ही जाणार कुठे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)