NCERT च्या पाठ्यपुस्तकातील सिंधू संस्कृतीतील स्त्री शिल्पाच्या मूर्तीचा वाद नेमका काय आहे?

नर्तकीची ही कांस्य मूर्ती मोहेंजो-दारो इथं सापडली असून ती इसवीसन पूर्व 2600 मधील आहे

फोटो स्रोत, NCERT

फोटो कॅप्शन, नर्तकीची ही कांस्य मूर्ती मोहेंजो-दारो इथं सापडली असून ती इसवीसन पूर्व 2600 मधील आहे
    • Author, शर्लिन मोलन
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

शालेय पाठ्यपुस्तकातून नग्न शिल्पाची 'झाकलेली' प्रतिमा काढून टाकण्यात आली आहे. इतिहास संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर हे करण्यात आलं आहे.

मोहेंजो-दारोतील नर्तकी म्हणून ओळखलं जाणारं हे कांस्य धातूची मूर्ती सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रसिद्ध कलाकृतींपैकी एक आहे. यात एक तरुणी तिचा एक हात कमरेवर ठेवून उभी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

मात्र, नवव्या इयत्तेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पाठ्यपुस्तकात या शिल्पाच्या धडाचा भाग गडद रंगानं झाकण्यात आला होता. त्यातून त्या शिल्पाची शारीरिक वैशिष्ट्यं लपवण्यात आली होती.

विरोधानंतर पाठ्यपुस्तकाच्या नव्या आवृत्तीत पुन्हा समावेश होणार

या गोष्टीवरून मोठा गरारोळ झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की या पाठ्यपुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीमध्ये मूळ शिल्पाची प्रतिमा पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहे.

तसंच, या पाठ्यपुस्तकाच्या पुढे छापल्या जाणाऱ्या आवृत्त्यांमध्येही या कांस्य शिल्पाचा मूळ फोटो वापरला जाईल.

शालेय पाठ्यपुस्तकात कांस्य मूर्तीच्या बदल करण्यात आलेल्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला होता. ही बातमी समोर समोर आल्यानंतर इतिहासकारांनी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) वर या ऐतिहासिक कलाकृतीचं विद्रुपीकरण केल्याचा किंवा तिला विकृतपणे सादर केल्याचा आरोप केला होता. एनसीईआरटीनं हे पाठ्यपुस्तक तयार केलं होतं.

एनसीईआरटी ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यातरित येणारी एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था सरकारद्वारे संचालित सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांमधील मजकूर तयार करणं आणि या अभ्यासक्रमात बदल करणं या गोष्टींवर देखरेख करते.

एनसीईआरटीचे संचालक दिनेश सकलानी यांनी पत्रकारांना सांगितलं की, या कांस्य शिल्पाचा बदलेलल्या स्वरुपातील फोटो पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात येईल.

"तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, विभाग नर्तकीच्या त्या बदललेल्या प्रतिमेच्या जागी त्या शिल्पाच्या मूळ स्वरुपातील प्रतिमेचा समावेश करत आहे," असं सकलानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

या मुद्द्यासंदर्भात सकलानी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीनं त्यांच्याशी संपर्क केला होता.

सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची कांस्य शिल्पाकृती

एका नवीन पाठ्यपुस्तकात ही मूर्ती दाखवताना तिच्या धडाचा भाग गडद रंगानं झाकण्यात आलेला होता.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, एका नवीन पाठ्यपुस्तकात ही मूर्ती दाखवताना तिच्या धडाचा भाग गडद रंगानं झाकण्यात आलेला होता.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिंधू संस्कृतीवरील धडा हा भारतीय शालेय अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा आणि आवश्यक भाग राहिला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये नर्तकीच्या मूर्तीचा समावेश अनेक दशकांपासून होत आला आहे. यात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांच्या जुन्या आवृत्त्यांचाही समावेश आहे. नर्तकीच्या शिल्पातील धड किंवा शरीरावर यापूर्वी कधीही सेन्सॉरशिप लादण्यात आली नव्हती. म्हणजे मूळ शिल्पाला कधीही प्रतिबंधित करण्यात आलं नव्हतं.

एनसीईआरटीनं या मूर्तीमध्ये बदल केलेला फोटो किंवा प्रतिमा का वापरली यामागचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे की, या मूर्तीच्या नग्नतेविषयीच्या चिंतेमुळे हा बदल करण्यात आला असावा.

इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं याविषयीची बातमी सर्वात आधी दिली होती. या वृत्तपत्रानं एका संपादकीय लेखाद्वारे या कलाकृतीत केलेल्या बदलांवर टीका केली आहे. यात म्हटलं आहे की, "नर्तकीची ही मूर्ती फक्त आंधळेपणानं स्वीकारलेल्या विनयशीलतेच्या निकषात बसते म्हणून महत्त्वाची नाही. तर ती संयम, आत्मविश्वास आणि लक्षवेधी, प्रभावी व्यक्तिमत्वाचं मूर्त स्वरुप आहे. जर शिक्षणाचं उद्दिष्ट हे जग जसं आहे तसंच ते समजून त्यात सहभागी होण्यासाठी तरुणांना सक्षम करण्याचं असेल, तर एनसीईआरटीनं विद्यार्थी आणि महिला, आजच्या काळातील आणि हजारो वर्षांपूर्वींच्या, यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर अधिक विश्वास ठेवून त्यांना याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे."

प्राचीन काळातील प्रगत धातुशास्त्राचा पुरावा

एनसीईआरटीच्या नवीन 'कला शिक्षण मालिके'चा (आर्ट्स एज्युकेशन सीरिज) हे पुस्तक एक भाग आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत (एनईपी) ती सुरू करण्यात आली आहे. दृश्य कला, सादरीकरणाची कला आणि साहित्य कला यांचा मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षणात समावेश करणं हा त्यामागचा उद्देश आहे.

नर्तकीची ही मूर्ती मोहेंजो-दारो इथं सापडली होती. मोहेंजोदारो ही प्राचीन सिंधू संस्कृतीच्या सर्वात मोठ्या वस्त्यांपैकी एक आहे. या शिल्पाकृतीमध्ये दागिने घातलेल्या आणि अंबाडा घातलेल्या स्त्रीचं चित्रण दिसतं.

या शिल्पातून मानवी शरीराची हालचाल दाखवण्यात आली आहे. पुरातत्वशास्त्रत्र या शिल्पाकृतीला उत्तुंग कलात्मक मूल्य आणि त्या संस्कृतीचं धातुशास्त्रातील प्रगत ज्ञान दाखवणारा पुरावा मानतात.

हे शिल्प किंवा मूर्ती सध्या दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)